Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर आमच्या शुभेच्छा!

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 21, 2021 5:18 pm
|

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोलेंनी म्हटलं आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखामधील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोकं जोड्यानं हाणतील अशी टीका काँग्रेसवर करण्यात आली आहे. स्वबळाचा नारा शिवसेनेकडूनही देण्यात आलाय परंतु काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असल्यास कुणाला का त्रास झाला पाहिजे? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमच्यावर कोणी टीका करत असेल तर त्याला आम्ही महत्त्व देत नाही असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पटोले यांनी म्हटलं की, “आधीचं सरकार ५ वर्ष चाललं, पण त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालले. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. तो शब्द आम्ही पाळू, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही. परंतु या दबावतंत्रामुळे भाजपाचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही.महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजपा मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम पद्धतशिरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत.

दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे.ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

सरनाईकांच्या पत्रातील मुख्य मुद्दा तपास यंत्रणा

प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांचा छळ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा छळ थांबवण्यासाठी भाजपशी पुन्हा युती करावी, असे सरनाईकांनी पत्रात नमूद केले आहे यावर नाना पटोलेंनी म्हटलं आहे की, प्रताप सरनाईक यांच्या पत्रातील मुख्य मुद्दा हा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देत आहे. या यंत्रणांच्या गैरवापराला आम्ही निषेध करतोय अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 21, 2021, 5:18 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *