आम्ही जनतेच्या मनात आमची प्रतिमा तयार केलीये त्यावरून…. ! प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे, तर, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे जनतेचे प्रश्न मांडतोय. ज्याप्रकारे आम्ही जनतेच्या मनात आमची प्रतिमा तयार केलीये त्यावरून आम्हाला विश्वास आहे येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी स्वबळावर लढण्याबाबत किंवा युतीकरण्याबाबत स्पष्टपणे भाजपची भूमिका सांगितली आहे. ‘भाजप कायमच स्वबळावर लढते. प्रश्न त्यांचा (महाविकास आघाडीचा) आहे. कोणी कोणाला जोडे मारायचे आहेत, कोणी कोणाच्या सोबत जायचं आहे, हा त्यांचा निर्णय आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि त्याच बांधिलकीसाठी भाजप काम करत आहे.’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी करत तूर्तास मात्र युतीची शक्यता नसल्याचं जरी भाष्य केलं असलं तरी येत्या काळात राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडणार हे महत्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले प्रताप सरनाईक?
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. राज्यात युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा तसाच आहे. ते पूर्ण तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतले तर निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर यांचा व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असे सरनाईक पत्रात म्हणतात. गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा सरनाईक यांच्या मागे लागला आहे हे येथे उल्लेखनीय होय. सरनाईक यांचे ९ जून रोजीचे हे पत्र रविवारी सोशल मीडियातून व्हायरल झाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 21, 2021, 4:30 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY