Cyclone Tauktae Live Updates:धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालगत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाऊस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली.
२ हजार ५४२ बांधकामांची पडझड
या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे जिल्ह्यात २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४ , रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. आज (सायंकाळी ५ वाजेच्या स्थितीनुसार ) हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किलोमीटर दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किलोमीटर प्रती तास इतका होईल पुढे तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातेत धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशी किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल असेही त्यांनी सांगितले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 17, 2021, 9:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY