Breaking News

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी येत्या दोन दिवसांत अडीच कोटी रुपयांची मदत पोहोचवणार,; शरद पवारांची घोषणा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 27, 2021 1:37 pm
|

मुंबई : राज्यातील पाऊस आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. राज्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून लवकरच राज्य सरकार मदतीची घोषणा करेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.येत्या दोन दिवसांत अडीच कोटी रुपयांची मदत गरजवंतांना पोहोचवणार असल्याचे पवार म्हणाले आहेत. यामध्ये 250 डॉक्टरांच्या टीमचा देखील समावेश राहील. ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झाले, त्या लोकांना तातडीने कीट वाटप केले जाणार आहेत. शरद पवारांसोबत यावेळी पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलताना म्हणाले की, राज्यातील सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकार पूरस्थिती अहवाल आल्यानंतर अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल. तसेच पुढे बोलताना माळीणमध्येही अशीच अवस्था झाली होती. सरकार आणि स्थानिक नेत्यांच्या मदतीने माळीणला पुन्हा उभे करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

राज्यात 16 हजार कुटुंब उद्भवलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. तर चिपळूण, खेडमधील पाच हजार, महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, साताऱ्यामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसल्याची माहिती शरद पवार यांनी बोलताना दिली. पुढे बोलताना, पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येईल. याशिवाय वैद्यकीय पथके पाठवली जातील. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील नेत्यांना पूरग्रस्त भागांचा दौरा न करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बोलताना केले. ते म्हणाले की, संकटग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे कामात अडथळे येतात असे पवारांनी आपल्या अनुभवातून सांगितले. पवार म्हणाले, माझा पूर्वीचा अनुभव आहे. प्रामुख्याने लातूरच्या वेळी… अशा घटना घडल्यानंतर लोक गाड्या घेऊन संकटग्रस्तांच्या भेटी घेण्यासाठी जातात. अशाने आधीच व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणांना अडथळे निर्माण होतात. त्यांचे लक्ष विचलित होते. माझे आवाहन आहे, की असे दौरे टाळा. मी लातूरला असताना आम्ही सगळे कामात होतो. तेवढ्यात पंतप्रधान येत होते. तेव्हा मी पंतप्रधानांना सांगितले होते, की 10 दिवस तुम्ही येऊ नका. तुम्ही आलात तर शासकीय यंत्रणांना तिथे लक्ष घालावे लागेल. त्यामुळे त्यांना 10 दिवसांनंतर येण्याची विनंती केली होती.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 27, 2021, 1:37 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *