कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल डायमंड असोसिएशनला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, संकटाची चिंता नाही पण या संकटाला सामोरे जातांना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करतांना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे, ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट ड्युट्या लावल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, त्यांचे टेस्टींग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कडक निर्बंध गरजेचे
राज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतू कोरोनाचा नवा विषाणु असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ७५ ते ८० टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना त्रासही होत नाही परंतू ते इतरांना बाधित करू शकतात, कोरोनाचा प्रसार करू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचाही शासन गांभीर्याने विचार करील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी देण्याची तयारी दाखवली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना निर्गमित होताच राज्यात अशाप्रकारे लसीकरण सुरु करता येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
डायमंड असोसिएशनच्या विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. मुख्य सचिवांनी सुरुवातील राज्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. राज्यात आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या परंतू त्याही कमी पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कडक निर्बंध लावावे लागल्याचे ते म्हणाले.
डायमंड इंडस्ट्री शासनासोबत
डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने उत्पादनक्षेत्रातील कंपन्या सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद देऊन म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य शासन कोरोना प्रतिबंधाचे काम चांगल्या प्रकारे करत आहे. संपूर्ण डायमंड इंडस्ट्री शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगतांना त्यांनी या उद्योगक्षेत्राला शासनाने अपेक्षेपेक्षा अधिक आणि विनाविलंब मदत केल्याबद्दल धन्यवादही दिले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 7:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY