ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई, :राज्यातील सरकारची अवस्था सध्या अशी झाली आहे की, प्रत्येक विभागाचे एकेक राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, अशी कठोर टीका करताना राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोवर भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
मुंबई येथे आयोजित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पंकजाताई मुंडे, आशीष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, या सरकारने कोविडमध्ये उत्तम काम केले अशी सरकारकडून आणि माध्यमांतील काही लोकांकडून पाठ थोपटली जाते, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात. उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची चर्चा करणारे बीडमध्ये 27 मृतदेहांची जी विटंबना झाली, त्याबाबत चकार शब्द बोलत नाहीत. महाराष्ट्राचे मॉडेल हे तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या सरकारसाठी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे तरी का? नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे ही शहरं महाराष्ट्रात आहे का? या सरकारच्या वागणुकीतूनच हे प्रश्न निर्माण होतात. एकतरी जंबो कोविड सेंटर मुंबईच्या बाहेर उघडले का?
केवळ आणि केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले. या सरकारमधील विद्वान मंत्री म्हणतात की, आधीच्या सरकारने केंद्राकडे डेटाची मागणी केली होती. पण, ती मागणी 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकविण्यासाठी होती. ते सुद्धा आरक्षण आम्ही अध्यादेश काढून टिकविले होते. पण महाविकास आघाडी सरकारला 50 टक्क्यांच्या खालचे आरक्षण सुद्धा टिकविता आले नाही. 15 महिने राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही. केवळ न्यायालयात तारखा मागत राहिले. त्यामुळे 50 टक्क्यांच्या आतले ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप हे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे आहे. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही तर एम्पिरीकल डेटाची गरज आहे. पण, यांना केवळ राजकारण करायचे आहे. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही. आरक्षण द्यायचे जमत नसेल तर आम्हाला सांगा. केवळ 4 महिन्यात करून दाखवितो. नाही करता आले तर पदावर राहणार नाही. आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. 26 जूनचे आंदोलन करून भाजपा शांत बसणार नाही. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर शांत बसणार नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण करणे, हे एकमेव काम सरकार करते आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त खोटे बोलणे, या सरकारचे एवढे एकच काम आहे. या सरकारने मराठा आरक्षणाचा सुद्धा खेळखंडोबा केला. कोविडच्या काळातील भ्रष्टाचार आणि एकूणच सार्या प्रश्नांवर या सरकारचा बुरखा फाडण्याचे काम येणार्या काळात भारतीय जनता पार्टी करेल, असेही ते म्हणाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 24, 2021, 7:02 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY