प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पहिल्याच दिवशी आश्वासन!
मुंबई :राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन पवारांची भेट घेतली. दरम्यान, गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते म्हणाले सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, यामध्ये “पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलीस हाऊसिंगसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी करायच्या आहेत”, असं ते म्हणाले आहेत.
यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती गेतल्यानतंर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले. मी आजच पदभार स्वीकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करेल. करोनामुळे सर्व पोलीस दल रस्त्यावर किंवा फील्डवर कार्यरत आहे. पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच करोना काळातल्या बंधनांची अंमलबजावणी करणं ही जबाबदारी देखील पोलीस विभागावर आहे. याच महिन्यात गुढी पाडवा, रमजान, आंबेडकर जयंती, राम नवमी आहे. हे दिवस त्या त्या धर्मीयांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यात आहेत. करोनाचा अंदाज पाहिला, तर या महिन्यात परिस्थिती अधिक आव्हानात्मक असणार आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील”, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. “उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे”, असं ते म्हणाले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस दलातील माहिती का मिळते? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यावरही लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोण काय आरोप करत आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझा पारदर्शक कारभार करण्यावर भर असेल, असं सांगतानाच दैनंदिन दिवसांमध्ये छोटे-मोठे गुन्हे होत असतात. हे गुन्हे निपटून काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रण तयार करण्याचा मानस आहे. त्या माध्यमातून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल”, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान , महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिक देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 3:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY