Devendra Fadnavis: ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले;फडणवीसांची महाविकासआघाडी सरकारवर घणाघाती टीका
मुंबई : विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशाच्या पुर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याबद्दल आघाडी सरकारला लक्ष्य केले. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या नावाखाली राज्य सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम केले आहे. राज्य सरकार जर जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू देत नसेल तर आम्ही ते जनतेच्या दरबारात जाऊन मांडू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांची कितीही कोंडी केली तरी आम्ही आमचे प्रश्न मांडत राऊ. जनतेसाठी आवाज उठवत राहू. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणीवीस बोलत होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. सरकार या अधिवेशनात विरोधकांना कोणतेही संसदीय आयुध वापरु देणार नाही. अधिवेशन कालावधी आणि एकूण कार्यक्रमाची आखणीच तशी केली आहे. परंतू, आम्ही गप्प बसणार नाही. जर संसदीय आयुधं वापरायची नाहीत. प्रश्न, उत्तरं नाहीत तर मग हे कसेल अधिवेशन? असा सवालही फडणवीस यांनी या वेळी उपस्थित केला. सरकारला विचारावेत असे विविध विषयांवरील 100 प्रश्न आमच्याकडे आहेत. परंतू, सरकारने अशी स्थितीच निर्माण केली आहे की, प्रश्नच विचारता येत नाहीत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे. त्यामुळे सरकारची एक एक अशी अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. मागच्या अधिवेशनात काहीचे राजीनामे गेले. आता पाठिमागील इतिहास पाहता सरकार सावध झाले आहे. आता या अधिवेशनात कोणाचे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी सरकारने अधिवेशनाला कात्री लावत अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला.
मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गुप्त भेटीवर भाष्य करताना मोठे विधान केले. राऊत-शेलार यांच्या भेटीबाबत मला माहिती नाही. मात्र दोन्ही पक्षांचे नेते भेटत असतील तर त्यात काहीही गैर नाही. शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे. आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आमचे शिवसेनेशी वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही. युती करण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, यापूर्वी आमचे शिवसेनेशी शत्रुत्व आणि वैचारिक मतभेद नव्हते. मात्र त्यांनी वैचारिक मतभेद असणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. राजकारणात जर-तरच्या प्रश्नाला अर्थ नसून त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात, असे म्हणत त्यांनी सेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या प्रश्नावर सावध भाष्य करणे पसंत केले. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सल्ला मी फडणवीसांना दिला होता, असं विधान आठवलेंनी केलं होतं. त्यावर आठवलेंनी योग्य वेळी योग्य सल्ला ऐकला असता तर ते मुख्यमंत्री झाले असते, असा टोला फडणवीसांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस ट्विट
राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढला आहे.
चहापान ही फार छोटीशी परंपरा,
ज्यांनी लोकशाहीला कुलूप लावले, त्यांच्याकडून चहापानाची अपेक्षा आम्हाला नाही: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 4, 2021
सरकारने प्रसिद्धीवर मोठ्या प्रमाणावर खर्च सुरु केला आहे. हा आकडा काहीशे कोटी रुपयांच्या घरात आहे. आमच्या काळात आम्ही कधीच प्रसिद्धीवर इतका खर्च केला नाही. महत्त्वाचे म्हणजे सर्व कामे बंद आहेत. जर कामेच बंद असतील तर मग प्रसिद्धी कसली करतात काय माहिती. या सर्वांचीच चौकशी व्हायला हवी असेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 8:48 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY