Breaking News

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, थेट राज्यपालांकडे मागणी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 19, 2021 7:40 pm
|

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. भातखळकर यांनी सकाळी दिंडोशी पोलिस ठाण्यात मलिक यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी पोलिसांना केलेल्या तक्रारीत केली आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा मार्ग आमच्यासाठी मोकळा असेल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार तमिळसेल्वन यांच्या शिष्टमंडळाने संध्याकाळी राजभवनला भेट देत राज्यपालांकडे तक्रार केली.

 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, “केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी. अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तर आ. भातखळकर यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, मलिकांनी केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविण्याचे काम केले आहे. राज्यात रेमडेसिवीर हे इंजेक्शन विकू नये यासाठी केंद्राने कंपन्यांवर दबाव आणल्याचे खोटे आरोप मलिक यांनी केले. त्यामुळे केंद्राबद्दल जनसामान्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण त्यांनी तयार केले. लोकांमध्ये भीती निर्माण केली. मलिक यांना हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान आम्ही दिले, पण त्यांच्याकडून अद्याप एकही पुरावा आलेला नाही.

भाजपा नेते भातखळकर यांनी त्याआधी दिंडोशी पोलिस ठाण्यात मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. जर पोलिसांनी मलिक यांच्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असेही भातखळकर म्हणाले. हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी कलम १५४ अंतर्गत तक्रार नोंदवून घेत मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणीही भातखळकर यांनी पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीत केली आहे.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीरवरून केंद्रावर गंभीर आरोप केला होता. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं होतं. राज्यसरकारने 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 19, 2021, 7:40 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *