राज्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचा छळ होऊ नये यासाठी पोलीस ठाण्यात गेलो;देवेंद्र फडणवीसांचे रिबेरोंना प्रत्युत्तर
मुंबई : माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी नुकताच एक लेख लिहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला . भाजपचे नेते पुन्हा सत्तेत येण्यासाठी उतावीळपणे राजकारण करत आहेत. या नादात देवेंद्र फडणवीस यांनी नसत्या चुका केल्याची टिप्पणी ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro) यांनी केली होती. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहूनच प्रत्युत्तर दिले आहे. या लेखात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.
देवेंद्र फडणवीसांचे पत्र
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीबद्दल आपण कौतूक केले, त्याबद्दल आभार, तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील. तुमचा स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या प्रोफेशनबाबत असलेली वचनबद्धता याचा मला नेहमीच आदर आहे. मला तुमचा प्रतिवाद करायचा नाही. कारण आपल्यात काही तात्विक मतं-मतांतरे असू शकतात. पण प्रत्येक टीका ही मी रचनात्मक पद्धतीने घेतो. पण, महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने जो चुकीचा प्रचार केला, त्याबाबत वस्तुस्थिती सर्वांसमोर ठेवणे, केवळ या हेतूने मी हा लेख लिहित आहे.
मी किंवा प्रवीण दरेकर यापैकी कुणीही रेमडेसिवीर भाजपासाठी खरेदी करणार नव्हतो. यासंदर्भात एफडीए मंत्र्यांना आधीच दिलेले पत्र हे स्वयंस्पष्ट आहे की, आम्ही केवळ समन्वय घडवून आणत आहोत आणि एफडीएनेच ते खरेदी करायचे आहेत. यात काही अडचणी प्रशासकीय पातळीवर येणार असतील, तर ते आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो, असाही प्रस्ताव दिला. प्रवीण दरेकर यांनी त्या उत्पादक कंपनीसोबत एफडीए मंत्र्यांसोबत संवादही घडवून आणला. यानंतरच एफडीएने अधिकृत पत्र या कंपनीला दिले. त्यामुळे हा साठा महाराष्ट्र सरकारलाच मिळणार होता, हे स्पष्ट होते. शिवाय, स्वत: एफडीए मंत्र्यांनी एका मुलाखतीत हा साठा राज्य सरकारसाठी होता, हे स्पष्ट केलेले आहे.
एका मंत्र्याच्या ओएसडीने या पुरवठादाराला फोन केला की, विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर का देता? तुम्ही केवळ सरकारच्या सांगण्यावरून दिले पाहिजे. त्यावर पुरवठादाराने सांगितले की, मी हा साठा केवळ सरकारलाच देणार आहे.
त्याचदिवशी सायंकाळी एक एपीआय सिव्हील ड्रेसमध्ये त्याला ट्रॅप करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी रेमडेसिवीर मागितले. पण, सदर कंपनीने त्याला ते देण्यास ठाम नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर रात्री ८ ते १० पोलिस त्यांच्या घरी गेले आणि त्यांचा फोन तपासला आणि त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. दरेकर यांनी मला माहिती दिली की काहीतरी गौडबंगाल आहे.
मी जॉईंट सीपी यांच्याशी २-३ वेळा बोललो. त्यांना संपूर्ण प्रकरण, एफडीएची परवानगी आणि धमक्यांचे कॉल याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी मुंबई पोलिस आयुक्तांना लँडलाईन, मोबाईल आणि एसएमएस अशा तिन्ही पद्धतीने संपर्क केला. पण, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माजी गृहमंत्री म्हणून मला अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अंदाज आला होता की, ही कारवाई राजकीय हेतूने होते आहे. महाराष्ट्राला ज्या औषधाची गरज आहे, ते मिळत असेल तर त्या व्यक्तीचा असा छळ होऊ नये, यासाठी धावपळ करणे, ही माझी नैतिक जबाबदारी होती.
जाहीर न करता मी तेथे गेलो असे नाही. हा संपूर्ण प्रकार मी सीपींना एसएमएसने कळविला. तुमच्याकडून प्रतिसाद नाही, म्हणून मी डीसीपी कार्यालयात जातोय, हेही कळविले. जॉईंट सीपी, अॅडिशनल सीपी, डीसीपी यांनाही कळविले. डीसीपी कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी मान्य केले की, एफडीएच्या आदेशाची प्रत आम्हाला माहिती नव्हती. तेथे गेल्यावर मी हा सुद्धा प्रश्न विचारला की, या कंपनीने साठेबाजी केली आहे का?, केली असेल तर तत्काळ कारवाई करा. पण, त्यांनी सांगितले की काही कंपन्यांची माहिती आहे.
१० मिनिटात जॉईंट सीपी आणि अॅडिशनल सीपी तेथे पोहोचले. आमच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सीपींशी खाजगीत चर्चा केली आणि नंतर त्या कंपनीच्या व्यक्तीला आवश्यकता पडल्यास पुन्हा बोलावू असे सांगून सोडून दिले.
माजी मुख्यमंत्र्यांनी पोलिस ठाण्यात जावे की नाही, यासंदर्भात मला सांगायचे आहे की, मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. सरकार ज्याला कॉल करीत नाही आणि आमच्या एका कॉलवर जो राज्याला मदत करतो आहे, त्याचा छळ होऊ नये, हा एकमेव हेतू होता. गृहमंत्री म्हणून मी कायम प्रोफेशनल इंटिग्रिटी पाळली आहे. आणि म्हणून माझ्या हातून कधी चूक झालीच तर एखाद्या पोलिस कॉन्स्टेबलची माफी मागण्यास सुद्धा मी मागेपुढे पाहणार नाही. कारण, मी नेहमीच माझ्या कामाशी प्रामाणिक राहिलो आहे. तरीसुद्धा तुमच्या मतांचा मला आदर आहे आणि तसा बदल घडवून आणण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 3:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY