Breaking News

आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले…(ब्लॉग )

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 16, 2021 4:08 pm
ठाणे | मनोहर गायकवाड

ठाणे : कोकणातील महाड तालुक्यातील तळीये गावच्या मधली वाडी वर आभाळ कोसळले. गावावर कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीवर अगदी जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे तळीये.या गावासह पोलादपुर तालुक्यातील केवनाळे चिपळूण मधील दरडी कोसळून जवळजवळ २१निशपा नागरिकांचे निधन झाले. महाड शहर, चिपळूण शहर, खेड व परिसरावर देखील हे अस्मानी संकट कोसळले.अर्थातच मनुष्य स्वभावानुसार अनेक हात येथील बधितांना मदत करण्यासाठी सरसावले . महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देश स्तरावरून जमेल तशी व जमेल तेवढी मदत पाठवली गेली.

ठाणे वर्तक नगर, दोस्ती विहार संकुलातील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या परिवारातील काही मित्रांनी देखील या मदतीचा एक भाग होण्याचे ठरवून तिकडे जाण्याचे ठरवले. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक सर्वश्री दशरथ पालांडे , संस्थेचे पदाधिकारी सिताराम बगडे, अशोक राशिनकर, रामप्रसाद शर्मा ,रविवार दि. १ आॅगस्ट २०२१ रोजी पाण्याच्या बाटल्या बॉक्स, तांदूळ , गहू,तूरडाळ ,साखर, तेल , बिस्किट्स, खाऊ आदी घेऊन दुपारी २ वाजता निघालो. दासगावपासूनच रस्त्याचा दुतर्फा अनेक ट्रक्स, टेम्पो, रुग्णवाहिका, सरकारी वाहने दिसू लागली… रस्त्यावर अनेक खड्डे, ट्रॅफिक जॅम मुळे आम्हाला खेडला पोहचण्यास रात्रीचे नऊ वाजले. आणि सकाळी .८ पासून चिपळूण शहर व ग्रामिन भागातील विस्तापित नागरिकानां व पुरग्रस्त नागरिकांना मदतीचे वाटप केले.

आम्ही तळीये मधली वाडी येथे पोहोचलो मात्र.! तेथील दुरवस्था, ओसाड वाडी, दुःखी, हताश, भकास चेहरे आणि आता करायचे काय.? या प्रश्नाने खिन्न झालेल्या चालत्या फिरत्या लाशी. सर्व पाहून आमचे मन खूप गहिवरले. आम्ही ठाण्यातील दोस्ती विहार परिवारातील ज्येष्ठ नागरिक संस्थेतील असल्याचे समजल्यावर या गावातील रहिवासी हे आम्हा सर्वांना प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी घेऊन गेले. सर्व घटनाक्रम आम्हाला सांगितला. ऐकून अंगावर काटे येत होते, देव का इतका निष्ठुर होतो.? असे वाटणे स्वाभाविकच होते. श्री. देविचे पुजारी श्री पांडे व कोंडसकर यांनी सांगितल्यानुसार दुपारी तीन/साडेतीनच्या सुमारास डोंगरातून लहानलहान दगडी, खडी, माती घरंगळण्यास सुरुवात झाली. काही ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. पण एवढे काही होईल असे वाटत नाही, आपण पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहत आहोत. आजवर जे घडलेच नाही ते कसे घडेल.? म्हणून ते स्वतःला समजवतात. पण काही तरुण ग्रामस्थांना रहावत नाही, ते वाडीतील इतर ग्रामस्थांना सावध करण्याचा पवित्रा घेतात. शेवटी वाडीतील बरेचसे ग्रामस्थ, महिला मुलांना घेऊन एका ठिकाणी एकत्र जमतात… काही तरुण ही सर्व दृष्ये आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करीत असतात, इतक्यात डोंगराचा आणखी काही भाग कोसळतो आणि कोसळू शकतो याचा विचार करत असतानातच ग्रामस्थ विचारविनिमय करीत असतानाच एक मोठा कडा वायूवेगाने खाली कोसळतो वीज पडावी असा मोठा आवाज होतो आणि त्यातील एकालाही पळण्याची संधी न देता हा दगडमातीचा मोठा कडा या सर्वांना आपल्या पोटात सामावून घेतो.नथुराम कोंडाळकर आणि गावातील इतर ग्रामस्थ हा घटनाक्रम सांगत असताना, ते ऐकूनच आपल्या जीवाचा थरकाप उडतो. एक दीर्घ श्वास घेऊन आम्ही आजूबाजूला नीट न्याहाळले. क्षणार्धात होत्याचे नव्हते करणारा हा प्रसंग, आणि ते अनुभवून तक्षणी सात महिन्याच्या बालकापासून वृद्ध/जर्जर झालेले असे मृत्युमुखी पडलेले ते ८५ जीव.! आपण कल्पनाही करू शकत नाही अशी ही मन चिरणारी घटना.! दरम्यान वीज व्यवस्था विस्कळीत झाल्याने व दूरध्वनी व्यवस्था कोलमडल्याने सदर घटना सरकारी यंत्रणेपर्यंत व लोकांपर्यंत पोहोचण्यासही विलंब झाला. साधारणतः तास/दीड तास उलटल्यावर ही बातमी यंत्रणेपर्यंत पोहोचली… सरपंच, गावातील काही ग्रामस्थांनी तेथून ७/८ किलोमीटर अंतरावरील बारसगाव येथे येऊन मोबाईल द्वारे ठाण्यातील तुळशीराम पोळ आणि इतर काही कार्यकर्त्यांना ही घटना कळवली, मग मात्र माध्यमांचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी धावून गेले.

मनात विचारांचा कल्लोळ माजलेला होता, आता मृतांच्या आप्तांना सरकारी मदत मिळेल, घरे बांधून मिळतील, पण त्या घरांमध्ये राहण्यास उरलेत किती.? घरेच्या घरे रिकामी झालीत, कुणाचे वृद्ध आईवडील, कुणाची कोवळी मुले गेली त्यांच्या मनाची किती घालमेल होत असेल.? अनेक आठवणी येत असतील, त्यांनी स्वतःच्या मनाला कसे समजवावे.? काहींच्या घरातील एकूणएक माणसे धरतीने गिळंकृत केली, त्याने उरलेले आयुष्य कसे काढावे? तेथील जि. प. शाळेमध्ये येणाऱ्या वस्तू/मदतीची रितसर नोंद केली जात होती. आम्ही नेलेले सर्व सामान त्यांचेकडे सुपूर्द केले. एका वृत्तवाहिनीवर विजय पांडे याचे पूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडल्याचे समजले, इतर दुःखी सदस्यांना भेटलो, आम्हाला त्यांनीही बराचसा घटनाक्रम सांगितला, विजयचे आईवडिल, पत्नी, सात वर्षाची मुलगी, सहा महिन्यांचा पुत्र निघून गेले, नियतीपुढे कुणाचे काहीही चालत नाही, तुम्ही आता स्वतःला सावरा असे त्या सर्वांना धीर, दिलासा दिला आणि जड पावलांनी आम्ही सर्व तेथून निघालो.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 16, 2021, 4:08 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *