Breaking News

महाराष्ट्राच्या विकासात शिवसेना नेत्यांचा अडथळा? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ठाकरे सरकारवर थेट लेटरबॉम्ब

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 14, 2021 3:08 pm
|

मुंबई : सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेले केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटरबॉम्ब एकच खळबळ उडाली आहे. आपल्या पत्रात नितीन गडकरी यांनी स्थानिक नेते राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचे त्यात म्हटले आहे.. या पत्रात उदाहरणासह अनेक घटनांचा उल्लेख आहे. या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदारांना त्रास दिला जात आहे. शिवसेना पदाधिकारी अनेकदा ज्या मागण्या करतात त्या अतिशय नियमबाह्य असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील रस्तेविकास प्रकल्प रखडण्याचा तसेच त्याची किंमतही वाढण्याची शक्यता असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात वेगळी चर्चा रंगली आहे.

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे …

१. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

४. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

५. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.

…तर महाराष्ट्रात नवीन रस्त्याची मंजुरी देताना विचारा करावा लागेल

गडकरी आपल्या पत्रात म्हणाले की, मागच्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामे रखडली आहेत. माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही कामे थांबवली असल्याचं मला कळलं. तसेच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरू राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असा इशाराही गडकरींनी सीएम ठाकरेंना दिला आहे.

काम बंद पाडेपर्यंत लोकप्रतिनिधींची मजल गेली

अधिकारी किंवा कंत्राटदारांनी त्यांचे ऐकले नाही तर कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडेपर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेल्याचे गडकरींनी पत्रात लिहिले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 14, 2021, 3:08 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *