Breaking News

‘लोकांनी किती दिवसं सहन करायचं? आता तरी लोकल सुरू करा!’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 22, 2021 9:08 pm
|

मुंबई :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील दीड वर्षांपासून मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लोकलची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याने मुंबईकरांचे रोज होणारे हाल थांबवण्यासाठी ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेत त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरू करा, अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

कोरोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नाहीये. नागरिकांकडून ही बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र…

महोदय,

गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बससेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते.

अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरू आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? ही साथ एकाएकी जाणार नाही असं जगातल्या तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच; परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की, महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सुचत नाही. महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत.

सर्वसामान्य माणसानं आतापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच; परंतु लोकल प्रवास तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल. त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरू केली जावी. विविध प्रकारच्या मोहिमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 22, 2021, 9:08 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *