Breaking News

देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच!

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 2, 2021 2:06 pm
|

मुंबई : साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते.

दरम्यान अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी केला. “देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याच्या ईडीवरील कारवाईनंतर शालिनीताई सर्वप्रथम एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली.

त्या म्हणाल्या , खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. त्यांनी 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. परंतु थोडा उशीर झाला पण आम्हाला न्याय मिळाला. आम्ही चार जणांनी अर्ज केला होता. 2019 मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी एफआयआर दाखल करुन ईडीने घेतली होती. त्यांनी मान्य केलं होतं की भ्रष्टाचार झाला होता. मला आनंद आहे 27 हजार सभासदांना न्याय मिळाला आहे. लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला एकदा सोडला तर कधीच निवडणूक कारखान्यात झाली नव्हती.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेला हा कारखाना २०१० मध्ये जेव्हा खरेदी करण्यात आला होता तेव्हा त्याचे मूल्य ६५.७५ कोटी रुपये इतके हाेते. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना व मशिनरी जप्त करण्यात आली. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हाही दाखल केला होता. २०१९ मध्ये नोंद एफआयआरच्या आधारावर हा पीएमएलएचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात म्हटले होते की, हा साखर कारखाना तेव्हाचे अधिकारी व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी अत्यंत कमी किमतीत आपल्याच नातेवाइक व इतरांना विकला. या व्यवहारात एसएआरएफएईएसआय कायद्यांच्या नियमांना डावलण्यात आले हाेते. या कायद्यान्वये बँकांना कर्ज वसुलीसाठी अचल संपत्ती विकण्याची मुभा होती.

ईडीने म्हटले की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने २०१० मधील लिलावात कारखान्याची किंमत कमी दाखवत व नियमांचे पालन न करता तो विकून टाकला. तत्कालीन बँकेच्या संचालक मंंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेही होते. हा कारखाना गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि.ने विकत घेऊन तो तत्काळ जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.ला लीजवर दिला, असा दावा ईडीने केला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 2, 2021, 2:06 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *