जव्हार येथील ३ अनाथ मुलींना दिले हक्काचे पक्के घर.. .. निभावले शिववचन
ठाणे : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावात राहाणाऱ्या जीवल हांडवा या वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबियांनी आर्थिक विवंचनेचा कंटाळून दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन मुली अनाथ झाल्या होत्या. मातापित्यांचे छत्र हरवलेल्या या मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांना पक्के घर, तसेच शिक्षण व उपजीविकेचे साधन मिळवून देण्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिंदे यांनी आपला शब्द पूर्ण केला असून सोमवारी श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत या तीन मुलींना त्यांच्या हक्काचे, पक्के घर मिळाले.
जीवल हांडवा यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर कोणाचाही सहारा नसलेली आणि पदरात ४ मुली असलेली त्यांची पत्नी रुकशाननेही पतीच्या मृत्यूनंतर बरोबर १२ व्या दिवशी स्वतःसोबत मुलींना विष देऊन सर्व संपवून टाकण्याचा निर्णय घेतला होता. सुमिता व जागृती या त्यावेळी अनुक्रमे ९ व ७ वर्षांच्या असलेल्या मुली शाळेत गेल्या होत्या. रुकशानने शाळेत जाऊन सुमिता व जागृतीस तिच्यासोबत लवकर घरी पाठविण्याची परवानगी मागितली, परंतु शाळेने ती नाकारली. मग रुकशानने घरी जाऊन दिपाली (वय – २.५ वर्षे) व वृषाली (वय – ९ महिने) यांच्यासह विषप्राशन केले. दुर्दैवाने रुकशानसह दिपालीचा मृत्यू झाला, पण केवळ ९ महिन्यांची वृषाली बचावली होती.
या हृदयद्रावक घटनेचे वृत्त समजताच श्री. एकनाथ शिंदे यांनी पिंपळशेत खारोंडा गावात धाव घेऊन वृषालीला रुग्णालयात योग्य व उत्तमोत्तम उपचार मिळण्याची व्यवस्था केली, तसेच शिवसेनेतर्फे या तीन निष्पाप जीवांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लगेचच तिघींच्या नावे प्रत्येकी १ लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये भरण्यात आले. ९ महिन्यांच्या वृषालीच्या संगोपनासाठी दरमहा शिवसेनेच्या वतीने ५ हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी या कुटुंबियांच्या झोपडीवजा घराची अवस्था बघून या तिन्ही बहिणींना राहाण्यासाठी पक्के घर बांधून देण्याची घोषणा श्री. शिंदे यांनी केली होती.
त्यानुसार, श्री. शिंदे यांनी दिलेला शब्द खरा केला असून शिवसेनेच्या वतीने या बहिणींना घर बांधून देण्यात आले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी कुंदन संख्ये यांनी स्वतः लक्ष घालून घराचे बांधकाम करून घेतले. या बहिणींना घराचा ताबा देण्यासाठी स्वतः श्री. शिंदे सोमवारी पिंपळशेत खारोंडा गावात उपस्थित होते. त्यांच्यासोबत खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 22, 2021, 12:40 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY