मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित,; वेळ पडल्यास पंतप्रधानांना भेटू: अजित पवार
पुणे: मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी प्रदीर्घ संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनपासून ते मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी वकिलांची जी फौज ठेवली होती. तीच फौज मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी ठेवण्यात आली होती, असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक आहे. मात्र सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्येच एक दिवसाचं अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षीयांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, असं पवार यांनी सांगितलं.
केंद्रावर टीका
यावेळी त्यांनी लसीकरणारवरून केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. रशियाने भारताला कोरोनाची लस दिली आहे. मात्र, त्यांच्या नागरिकांचं लसीकरण केल्यावरच त्यांनी भारताला लस पाठवली. आपण आपल्या देशातील नागरिकांचं लसीकरण पूर्ण न होताच इतर देशांना लसी पाठवल्या. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस देणं गरजेचं आहे. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे. लस नसल्याने ही अडचण निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरात तफावत नको
यावेळी त्यांनी लसीच्या दरांवरूनही केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारला लस स्वस्तात मिळत आहे. राज्यांना मात्र महागड्या दरात लस मिळत आहे, असं सांगतनाच सीरमचे अदर पूनावाला परदेशात आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या 10 ते 12 दिवसात ते भारतात येतील. ते आल्यावर लस आणि लसींच्या दरांबाबत त्यांच्याशी चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.
निर्णय मुख्यमंत्री घेतील
यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं सांगितलं. मात्र, पुण्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 7, 2021, 5:44 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY