Breaking News

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 3, 2021 11:24 am
|

मुंबई : येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बैठकीचे संचालन केले.

यावेळी कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विभाग, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती दिली तसेच सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान विभागाने पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळत राहील तसेच त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल याची काळजी घ्यावी. मासेमारी बोटींशी या काळात संपर्क असावा व त्यांना देखील सूचना मिळत राहतील ते पहावे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याची काळजी घ्यावी.

तिवरेसारखी दुर्घटना घडू नये म्हणून सावध राहावे

गेल्या वेळेस तिवरे धरणाची दुर्घटना घडली होती. यंदा सबंधित सर्व यंत्रणांनी देखील मातीच्या धरणांची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी. तसेच, आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील सावध करावे आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. गेल्या वर्षी देखील पावसाळ्याच्या काळात पालघर मध्ये लहान लहान भूकंपांची मालिका सुरु झाली होती हे पाहता तेथील यंत्रणेने देखील सावध राहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सादरीकरण केले गेल्या वर्षी विभागात ३१७३ मिमी पाऊस झाला होता असे सांगितले. विभागात ३७१ पूर प्रवण आणि २२३ दरडग्रस्त गावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु झाले असून ते २४ तास सुरु राहणार आहेत. याशिवाय जीवरक्षक बोटी, जॅकेट व इतर सामुग्री उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तुकडी चिपळूण येथे तैनात ठेवण्यासाठी विनंती केली आहे, मॉक ड्रील झाले असून निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसची नुकसान भरपाई १०० टक्के दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

चार ठिकाणी लवकरच नवीन रडार

यावेळी बोलताना हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण व अचूक होऊ शकेल अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा. पण २०१७ पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नुकसान केले. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मेमध्ये जास्त असतो असे सांगून होसाळीकर यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे शक्य झाल्याची माहिती दिली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 3, 2021, 11:24 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *