Breaking News

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, महाराष्ट्रातही प्रत्येक नागरिकांना मोफत लस

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 25, 2021 4:14 pm
|

मुंबई : देशात सध्या कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच जोडीला देशात लसीकरण मोहीमही सुरू आहे. राज्यातील वाढता करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू केला आहे. इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केलं असून, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. मात्र, १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली. मलिक म्हणाले,”केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे वय वर्ष ४५ खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.

“महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून, जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. मागच्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे. याशिवाय राज्य सरकार लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आता जागतिक निविदा काढणार असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली. या निविदांसाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात येणार असून राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे समितीचे अध्यक्ष असतील. एक मे महाराष्ट्र दिनी याबाबत कार्यवाही सुरू होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली होती.

दुसरीकडे, कोरोनाच्या लस उत्पादक कंपन्यांनी लसीच्या किमत जाहीर केल्या आहेत. कोव्हिशील्ड राज्य सरकारला 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयां मिळणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारला 600 रुपयांना, तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांना मिळणार आहे. लसींच्या या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या मनात विविध शंका निर्माण झाल्या आहेत. यामुळे यापूर्वीच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने, मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने व छत्तीसगडमध्ये तेथील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वांना मोफत लसीची घोषणा केली. यामुळे महाराष्ट्रातही लसीकरण मोफतच करण्याची मागणी जोर धरू लागली होती.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 25, 2021, 4:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *