बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : अभिनेत्री शशिकला ओम प्रकाश सैगल यांचं निधन झालं आहे. रविवारी दुपारी 12 वाजता त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी झोपेत अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन विश्वात एक अनुभवी अभिनेत्री म्हणून ओळख आहे. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. के.एल. सेहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. कुलाबा येथील चर्चमध्ये शोकसभा ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली.
शशिकला या मुळच्या सोलापुरच्या होत्या.सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिला ओमप्रकाश सैगल बनल्या. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना त्यांनी फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला होता. ‘झीनत’ या सिनेमात त्या एका कव्वाली दृष्यात झळकल्या होत्या. शम्मी कपूर यांच्यासोबत त्या ‘डाकू’ या सिनेमात झळकल्या होत्या. वी. शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्ता या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती. अनेक सिनेमांमध्येत त्या सहाय्यक भूमिका आणि खलनायिका साकारताना दिसल्या. 100 हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. त्यांचा अभिनय आणि विशेषकरून संवादकौशल्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या.
1959 मध्ये बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ सिनेमात त्या झळकल्या होत्या. ताराचंद बरजात्यांच्या ‘आरती’ या सिनेमात त्यांनी खलनायिका साकारली होती. ‘अनुपमा’, ‘फुल और पथ्थर’, ‘आयी मिलन की बेला’, ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘खुबसुरत’ या आणि इतर काही सिनेमांमध्येही त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. 1974 मध्ये ‘छोटे सरकार’ सिनेमात त्या पुन्हा खलनायिकेच्या भूमिकेत झळकल्या. या सिनेमात त्यांनी शम्मी कपूर आणि साधना यांच्यासोबत काम केले होते. ‘परदेसी बाबू’, ‘बादशाह’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘चोरी चोरी’ या सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. शशिकला यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलय. 1962 मध्ये ‘आरती’ सिनेमासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. तर 1963 मध्ये ‘गुमराह’ सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रईचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. 2007 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2009 मध्ये त्यांचा वी. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. शशिकला यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 4, 2021, 4:02 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY